पुणे स्टेशनवरील रेल्वेगाड्यांची वर्दळ कमी व्हावी , म्हणून हडपसरमध्ये रेल्वे टर्मिनसचे उभारण्यासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षणाचे काम महिन्याभरात सुरू होणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहे , रेल्वेलाइन किती टाकता येणार आहेत , प्लॅटफॉर्मची संख्या किती ठेवता येईल , याचा अभ्यास करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रस्तावित स्टेशनचे प्राथमिक डिझाइन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे काम एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुबोध जैन यांनी पुणे भेटी दरम्यान हडपसर येथे स्वतंत्र टर्मिनस सुरू करण्याची योजना असल्याचे सांगितले होते.
रेल्वे...
more... प्रशासनाकडून हडपसरमध्ये करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या आधारावर पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले. प्रस्तावित रेल्वे स्टेशनचे डिझाइन तयार होण्यास काही कालावधी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून पुणे स्टेशनवरील रेल्वे गाड्याची वाहतूक वाढली आहे , त्यामुळे या स्टेशनवरून नवीन रेल्वेसेवा सुरू करणे शक्य होत नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. रेल्वे वाहतुकीत वाढ झाल्यामुळे पुणे स्टेशनवरील पायाभूत सुविधांना मर्यादा येत आहेत , त्यामुळे गरज असूनदेखील पुणे स्टेशनवरून नवीन गाड्या सुरू करणे रेल्वेला शक्य होत नाही. प्रस्तावित हडपसर स्थानकाचे काम वेळेत पूर्ण झाल्यास रेल्वेसेवेत वाढ होणार असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.
हैदराबाद , मुंबई , दिल्ली या ठिकाणी अधिक रेल्वे स्टेशन्स झाली आहेत. पुण्याचा वाढता विकास पाहता शहराला आणखी एका स्टेशनची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानकाचे काम वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रवाशांनी नोंदवले आहे.